Diabetes


मधुमेह आणि नेत्रविकार

मधुमेह अथवा डायबिटीज़ हा रोग म्हणजे रक्तातिल साखर प्रमाणाबाहेर वाढून होणार रोग आहे. जगातील सर्वाधिक मधुमेहांची संख्या भारतात आहे आणि यापुढे ती आणखी वाढत जाण्याची शक्यता आहे. या रोगामध्ये डोळ्या व्यतिरिक्त मूत्रपिंड व हृदय अश्या जवळजवळ सर्व महत्वांच्या अवयवांवर दुष्परिणाम होते. इतर लोकांमध्‍ये दिसून येणाऱ्या नेत्रविकारांपेक्षा मधुमेही लोकांमध्‍ये नेत्रविकाराचे प्रमाण खूप जास्त असते. प्रत्येक मधुमेही व्यक्तीला डायबिटीक रेटिनोपैथी होईलच असे नाही पण मधुमेह झाल्यानांतर ही व्याधी होण्याची शक्यता अनेक पटींनी वाढते अश्या परिस्थीतीत आपण (विशेषतः मधुमेहाच्या रुग्णांनी) या व्याधिची सविस्तार माहिती घ्यायला हवी. विशेषतः पाच वर्षापेक्षा जास्त मधुमेह असलेल्या रुग्णामध्ये डोळ्यांवरील दुष्परिणाम हमखास दिसून येतात. मधुमेहाचे निदान झाल्यावर, मधुमेहतज्ञ रुगणाला डोळ्याची नियमित तपासणी करुण घ्यायला सांगतात कारण त्याचा सर्वाधिक परिणाम डोळ्यांवर होतो.


मधुमेहामुळे डोळ्यांचे कोणते विकार होतात?

1) डायबिटीक रेटिनोपॅथी : हा सर्वात जास्त प्रमाणात आढळणारा दोष आहे. सर्वांपेक्षा गंभीर आणि दृष्टी कायमची अंधुक किव्हा अंध करू शकणारा विकार म्हणजे मधुमेहजन्य नेत्रपटल विकार अर्थात डायबिटिक रेटिनोपॅथि, यात डोळयाच्या मागील पडद्यावरिल रक्तवाहिन्या दोषग्रस्त होतात.

रेटिनाच्या दुष्परिणामांचे विभाजन शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिले तर थोड़ी क्लिष्ट माहिती ठरेल. सोप्या शब्दांत सांगायचे तर सौम्य, मध्यम आणि तीव्र स्वरूप अशा भागांमध्ये या दुष्परिणामांची विभागणी करता येईल.

A. मधुमेहामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. त्यामुळे रक्तवाहिन्या विस्तारीत आणि आतून पातळ होतात. रक्तवाहिण्यांच्या भिंती कुमकुवत झाल्याने कधी कधी त्यातून रक्तस्त्राव होतो रेटिनाच्या पृष्ठभागावर रक्तखावाचे ठिपके दिसणे, रक्तवाहिन्यांना छोट्या गुठळ्या येणे, हे बदल सौम्य दुष्परिणाम दर्शवतात. यासाठी ताबडतोब उपचार लागत नाहीत. परंतु नेत्रतज्ज्ञ सांगतील त्या कालावधीने डोळे नियमितपणे तपासून घ्यावेत.

B. रक्तवाहिण्या (केशवाहिन्या अरुंद होवुन रेटीनाचा रक्तपुरवठा कमी होतो किंवा थांबतो. केपवाहिन्या अरुंद झाल्यावर रेटिनाचा रक्तपुरवठा पुर्वरत करण्यासाठी आपोआप नविन केशवाहिन्या तयार होतात. पण, या केशवाहिन्या अत्यंत नाजुक असल्याने त्या सहज फुटु शकतात. रेटिनावर मोठा रक्तस्राव होणे, पांढऱ्या रंगाचे चट्टे उमटणे, जाळ्यांसारख्या केशवाहिन्या वाढणे हे जास्त प्रगत स्वरूपाचे व गंभीर दुष्परिणाम आहेत. यात नेत्रतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार लेसर किरण उपचार करून घेणे आवश्यक असते. हा उपचार नजर सुधारण्यासाठी नसून, भविष्यकाळात नजर कमी होऊ नये यासाठी प्रतिबंध म्हणून असतो.

C. रेटिनाच्या पृष्ठभागावर असणारा हा रक्तस्राव, रेटिनाच्या पुढे असणाऱ्या व्हिट्रीयस ह्यूमर या जेलीमध्ये प्रवेश करून त्याचा मोठा भाग व्यापून टाकतो. अभ्रकासारखे पडदे रेटिनाच्या पृष्ठभागावर तयार होतात, हे अतिगंभीर दुष्परिणाम आहेत. यासाठी योग्य वेळी व्हिट्रेक्टॉमी नावाची क्रिया करावी लागू शकते. ही क्रिया आणि मोतीबिंदूसारख्या शस्त्रक्रियेपेक्ष थोडी जास्त धोक्याची असते.

D. रेटिनाच्या मध्यभागी असणाऱ्या एका छोट्या भागाला मॅक्युला असे म्हणतात. हा अगदी छोटा भाग दृष्टीसाठी सर्वांत महत्त्वाचा असतो. लेखन-वाचन करणे, कोणा व्यक्तीचा चेहरा ओळखणे या सर्व गोष्टीक्युलाच्या क्षमतेवर अवलंबून असतात. मॅक्युलावर सूज येणे, त्यावर पांढरे चट्टे उमटणे किंवा रक्तस्राव होणे यांमुळे दृष्टी क्षीण होते. रुग्णाच्या ते ताबडतोब लक्षात येते. यासाठी रेटिनाच्या पुढे असणाऱ्या व्हिट्टीयस हह्यूमर जेलीमध्ये औषधाचे इंजेक्शन देणे ही सर्वात रुड उपचारपद्धती आहे. एक नव्हे, तर अनेक इंजेक्शन्स पहिल्या दोन-तीन वर्षात खावी लागू शकतात. या इंजेक्शनमुळे दृष्टी स्थिर राहण्यास मदत तर होतेच; शिवाय, अनेक रुग्णांमध्ये दृष्टीमध्ये सुधारणासुद्धा होऊ शकते. या इंजेक्शनच्या उपचारासाठी तीन चार प्रकारची औषधे उपलब्ध आहेत.

दृष्टीपटलाची : मागील पडद्याची तपासणी ( Retina Checkup )

ही तपासणी रुग्णाच्या डोळ्यांत बाहुली मोठी करावयाचे थेंब टाकून केली जाते.

a) फंडस कॅमेरा (Fundus Camera) डोळ्यांच्या मागील पडद्याचे फोटो Fundus camera या यंत्राद्वारे घेतले जातात.

b) OCT (Optical Coherence Tomography) ओसीटी या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे मधुमेही रुग्णाची तपासणी अधिक सूक्ष्मपणे करणे शक्य झाले आहे. डोळ्याचा मागील पडदा (रेटिना) हा विविधपेशींनी बनलेला असतो. या पेशी दहा घरामध्ये पसरलेल्या असतात. काही वेळा मधुमेही रुग्णांच्या रेटिनाला सूज येते. ही सूज कोणत्या थरात (layer) आहे. तसेच त्याची तीव्रता किती प्रमाणात आहे. याविषयीची माहिती या ओ सी टी यंत्राने मोजून, रुग्णाची उपचारपद्धती ठरवण्यास डॉक्टरांना मदत होते. औषधोपचार केल्यानंतर उपचारपद्धतीची सफलता समजण्यास सुद्धा या तपासणीचा उपयोग होतो. परिणामकारकताही या तंत्रज्ञानामुळे सुरक्षितपणे तपासणे सहज शक्य होते.

2) मोतीबिंदु : मधुमेही रुग्णामध्ये मोतीबिंदु चुप लवकर वयात होतो. हा मोतीबिंदु अचानक पिकु शकतो.

3) चष्म्याचा नंबर बदलणे :रक्तातील साखरेचे प्रमाण वरचेवर कमी जास्त झाल्यामुळे चष्म्याचा नंबर वारंवार बदलु शकतो. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त असल्यास चश्म्याचा नंबर काढू नये कारण जेव्हा रक्तातील साखर कमी होईल तेव्हा पूर्वीचा चष्मा लागणार नाही.

4) रांजणवाडी, डोळे येणे यासारखे रोग मधुमेही रुग्णांमधे जास्त दिसुन येतात.

5) नेत्रपटलावरिल रक्तवाहिन्या बंद पडणे.

6) काचबिंदु होणे ई. हे विकार मधुमेही रुग्णामधे अधिक आढळतात.

शेवटी लक्षात असू द्या. मधुमेहामुळे होणारे डोळ्याच्या पडद्यावरिल दोष रुग्णाच्या लक्षात येत नाही लक्षात येईपर्यंत फार उशीर होवु शकतो. त्यामुळे प्रत्येक मधुमेही रुग्णांनी डोळ्याची तक्रार नसताना ही वर्षातुन एकदा नेत्रतज्ञकडुन डोळ्याची संपुर्ण तपासणी करणे जरुरी आहे.



मधुमेही रुग्णांनी घ्यावयाची डोळ्याची काळजी

• नियमितपणे तपासणी: मधुमेही रुग्णांनी आपलीरक्तातील साखर, BP डोळ्याच्या दृष्टिपटलाची तपासणी नियमित करणे गरजेचे आहे. चाळीस वर्षांवरील रुग्णांनी वर्षातून किमान एक वेळा तपासणी करणे गरजेचे असते. मधुमेहामुळे मागील पडद्यावर रक्तस्राव झाला आहे, अशा रुग्णांनी वर्षांतून किमान दोन वेळा किंवा दर तीन महिन्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मागील पडदा तपासून घ्यावा.

• आहार व जीवनसत्त्वे: नियमित व संतुलित आहार, तसेच जीवनसत्त्वांचे सेवन मधुमेह नियंत्रणात राहण्यासाठी उपयुक्त आहे. आवश्यकतेनुसार आहारतज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतल्यास त्याचा अधिक फायदा होतो.

• व्यायामः मधुमेही रुग्णांनी नियमितपणे व्यायाम केला तर मधुमेह नियंत्रणात राहतो. त्याचप्रमाणे मधुमेहामुळे उद्भवणारे इतर धोके टाळता येऊ शकतात,

संतुलित व योग्य आहार,
नियमितपणे केलेला व्यायाम,
आणि नियमित तपासणी व योग्य उपचार
ही मधुमेही रुग्णासाठी सुदृढ आयुष्याची त्रिसूत्रीच ठरेल.

डॉ. अतुल कढाणे एम. एस. ( नेत्ररोग )
  लॅसिक, लेसर व फेंको सर्जन
  सचिव- विदर्भ नेत्र संघटना
  सहसचिव- महाराष्ट्र नेत्र संघटना
  संचालक- यश नेत्रालय
  विजय कॉलनी, रुख्मिणी नगर, अमरावती